Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजाराच्या आरोप-प्रत्यारोपांत आज चार राज्यांच्या 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे प्रमुख उमेदवार आहेत. हे सर्व नेते कोणत्याही अडथळ्याविना विजयी होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्व 41 उमेदवार गेल्या शुक्रवारी बिनविरोध निवडून आले. मात्र, शुक्रवारी म्हणजेच, आज हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कारण उमेदवारांची संख्या लढवायच्या जागांहून अधिक आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यात थेट लढत
महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार असून, गुरुवारी सर्वच राजकीय पक्ष आपली रणनिती आखण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार असल्यानं सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे. सत्ताधारी आघाडीतील सूत्रांनी सांगितलं की, ते मतदान सुरू होण्यापूर्वीच विधानसभेसाठी रवाना होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपापल्या पक्षांच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करून त्यांची रणनीती निश्चित केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.
कोणाकडे किती मतं?
शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, भाजप 106, बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी दोन, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आणि 13 अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 25 इतर मतांवर विसंबून आहेत.
चार राज्यांतील परिस्थिती काय?
हरियाणातील दोन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी सत्ताधारी भाजप आणि त्याच्या काही मित्रपक्ष जेजेपीच्या आमदारांना दुसऱ्या दिवशी चंदीगडजवळील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे आमदारही छत्तीसगडमधील एका रिसॉर्टमध्ये आहेत. प्रतिस्पर्धी पक्षांकडून घोडेबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक पक्ष आपापल्या परिनं सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं आहे की, "आम्ही चारही राज्यांत विशेष निरीक्षक नेमले आहेत. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे."
हरियाणामध्ये अजय माकन काँग्रेसचे उमेदवार असले तरी कार्तिकेय शर्मा यांनी उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेससमोर उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. काँग्रेस उमेदवाराचे एक मत जरी कमी पडले तरी माकन यांची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. हरियाणात काँग्रेसला 31 पहिल्या पसंतीची मते हवी आहेत. तेवढीच मते काँग्रेसकडे आहेत. यातील एकाने जरी क्रॉस व्होटिंग किंवा एखादे मत अपात्र ठरल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीच्या रणांगणात जावे लागेल.
राजस्थानमध्ये काँग्रेसकडून रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु सुभाष चंद्रा यांनी भाजपचे समर्थक म्हणून उमेदवारी दाखल केल्याने पेच निर्माण झाला आहे.
कर्नाटकमध्ये चार जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसचा एक-एक सदस्य सहज निवडून येईल. पण, चौथ्या जागेसाठी काँग्रेस, जेडीएसनं उमेदवार दिल्यानं राजकीय गणित बिघडलं आहे. काँग्रेसनं मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली खरी. परंतु त्यांना निवडून येण्यासाठी अतिरिक्त 20 मतं हवी. जेडीएसचे 32 आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य अधांतरी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :