Titwala Crime News : कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा  परिसरात वृध्द दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशोक भोसले आणि विजया भोसले असं मयत पती पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हत्येप्रकणी भोसले यांचा मुलगा अनमोल याला अटक केली आहे. 


मुलगा अनमोलनं चाकूनं गळ्यावर वार करत आपल्या आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो मृतदेहाशेजारीच बसून होता. दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या बहिणीला आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर तिनं घरात येऊन पाहिलं असता सगळा प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्यानं ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 


कल्याण जवळ टिटवाळा मांडा येथील पंचवटी चौक साई दर्पण इमारतीत (वय 70) वर्षीय अशोक भोसले, त्यांची पत्नी विजया भोसले (वय 60) आणि त्यांचा मुलगा अनमोल (वय 37) असं कुटुंब राहत होतं. अनमोलचे लग्न झाले असून अनमोल एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. अनमोलने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्याच्या बहिणीला आई-वडीलांचा मृत्यू झाल्याचं सांगत घरी बोलावून घेतलं. अनमोलची बहीण घरी आली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आई-वडिलांचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. घरात दुर्गंधी येत होती. अनमोल त्यांच्या शेजारीच बसला होता. सगळच संशयास्पद वाटल्यानं  तिनं याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात माहिती दिली.


पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या दोघांची हत्या त्यांचा मुलगा अनमोलनं केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अनमोलला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यानंच चाकूनं गळ्यावर वार करत या दोघांची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अनमोलला अटक केली. 


कौटुंबिक वादातून अनमोलला नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून अनमोलनं आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानं बुधवारी आपल्या आईवडिलांची चाकूनं वार करत हत्या केली. दिवसभर तो दोघांच्या मृतदेहासोबतच होता आणि त्यानं गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. दरम्यान अनमोल हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात देखील राहत होता. त्यानं कोळसेवाडी पोलिसांना अनेकदा फोन करून आई-वडील पैसे घेतात, असं खोटेनाटे आरोप केले होते. अनेकदा पोलिसांना फोन करून त्रास दिला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अनमोल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.