राजकारण हे किती अनिश्चित असू शकतं आणि एखाद्या घटनेमुळे हातातोंडाशी आलेला घास कसा लांब जाऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजुरा मतदारसंघ. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या भागातली प्रत्येक निवडणूक काँग्रेसने जिंकली, मोदी लाटेत देखील अवघ्या दोन हजार मतांनी विधानसभा हरणारे माजी आमदार सुभाष धोटे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आणि ते सहज जिंकतील अशी परिस्थिती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अचानक असा काही घटनाक्रम झाला की सुभाष धोटे यांना पक्ष तिकीट देणार की नाही याबाबतच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

घटनाच अशी होती की ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. ही घटना होती राजुरा येथील अल्पवयीन आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषणाची. ही घृणास्पद घटना ज्या शाळेत झाली त्या शाळेचे माजी आमदार सुभाष धोटे हे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला. या घटनाक्रमात सुभाष धोटे यांचा कुठलाच सहभाग नसल्यामुळे त्यांनाच तिकीट मिळेल असं जिल्ह्यातील काँग्रेस नेते निक्षून सांगत आहेत मात्र या घटनेमुळे विजयाची खात्री असलेल्या सुभाष धोटेंना तिकीट द्यायची की आदिवासी समाजाचा रोष पत्करायचा या व्दिधा मनःस्थितीत काँग्रेस पक्ष अडकला आहे. काँग्रेस पक्षाला या लोकसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघातून तब्बल ३५ हजारांची आघाडी मिळाली आहे आणि ही आघाडी हा मतदारसंघ काँग्रेससाठी किती अनुकूल आहे हे दाखविण्यासाठी पुरेसा आहे.

गेल्या तीन महिन्यात राजुरा मतदारसंघात झालेला हा घटनाक्रम जितका रंजक आहे तितकाच रंजक या मतदारसंघाचा इतिहास आहे. या मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेस आणि त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वामनराव चटप यांचे वर्चस्व राहिलंय. वामनराव चटप यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र २००९ मध्ये वामनराव चटप यांनी विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला पुन्हा एकदा संधी मिळाली. काँग्रेसचे सुभाष धोटे आमदार झाले आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे मतदारसंघात अनेक विकास कामांचा त्यांनी धडाका लावला. २०१४ मध्ये पुन्हा तेच आमदार म्ह्णून निवडून येतील अशी परिस्थिती होती. मात्र देशात आणि राज्यात आलेल्या मोदी लाटेचा सुभाष धोटेंना फटका बसला. धक्कादायक म्हणजे २०१४ पर्यंत या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे अस्तित्व हे अगदी नगण्य होते. विधानसभेची ही जागा शिवसेनेच्या कोट्यात होती आणि ही जागा फक्त नावापुरती लढवायची हा युतीचा पंचवार्षिक कार्यक्रम होता. मात्र २०१४ मध्ये युतीचा काडीमोड झाला आणि भाजप मोदी लाटेवर स्वार होत स्वबळावर लढली. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपचे संजय धोटे अवघ्या दोन हजार मतांनी आमदार झाले.

भाजप आमदार संजय धोटे यांच्या विजयात मोदी लाटेचा मोठा हात असला तरी शेतकरी संघटनेची देखील त्यांना मोठी मदत झाल्याचं मानलं जातं. संजय धोटे हे वामनराव चटप यांचे शेतकरी संघटनेतील जुने सहकारी आहेत. वामनराव चटप स्वतः उमेदवार नसल्यामुळे शेतकरी संघटनेची मतं संजय धोटेंकडे वळली आणि ते विजयी झाले. मात्र या वेळी वामनराव चटप स्वतः राजुरा विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे. सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव आणि विधानसभा न लढविण्याचा निर्णय यामुळे वामनराव चटप यांच्या शेतकरी संघटनेचीही वाताहत झाली आहे. त्यामुळे वामनराव चटप यांनी २०१९ ची विधानसभा राजुरा मतदारसंघातून लढविणार हे जाहीर केलंय.

संजय धोटे यांच्या रूपात भाजपचं कमळ राजुरा विधानसभेत फुललं असलं तरी दुसऱ्यांदा विजय मिळवणं भाजपसाठी सोपं नाही. सत्ता असून देखील विकास कामं खेचून आणण्यात आमदारांना अपयश आलंय असा सातत्याने विरोधकांकडून आरोप केल्या जातो. या मतदारसंघात भाजपच्या लोकसभा उमेदवाराला ३५ हजारांची पिछाडी मिळाल्यामुळे संजय धोटे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिपचे विद्यमान अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नावाची देखील भाजप उमेदवार म्हणून चर्चा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुभाष धोटे यांच्या नावासोबतच गोदरु पाटील जुमनाके यांच्या देखील नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिंकण्यास अतिशय सुपीक प्रदेश असल्याचे लक्षात आल्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार देखील या मतदार संघाकडे आपला मोर्चा वळवू शकतात. विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव करंजी हे याच मतदारसंघातील गोंडपिंपरी तालुक्यात आहे. माजी आमदार सुदर्शन निमकर हे देखील राजुरा विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी यासाठी आग्रह धरून बसले आहे. सुदर्शन निमकर हे या भागातील एक प्रभावशाली नाव असून त्यांचा स्वतःचा एक ठराविक मतदार आहे.

आगामी विधानसभा ही माजी आमदार सुभाष धोटे आणि वामनराव चटप यांच्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्याची लढाई असणार आहे तर दुसरीकडे भाजपला राजुऱ्याची जागा मोदीलाटेमुळे मिळाली नसल्याचे सिध्द करायचे आहे. एकंदरीत राजुरा मतदार संघाची ही लढाई जिल्ह्यातील सर्वाधिक रंजक असेल यात शंकाच नाही.

विधानसभा २०१४ 
संजय धोटे (भाजप)  - ६६,०५०  आघाडी २२८२
सुभाष धोटे (कॉंग्रेस) - ६३,७३८
सुदर्शन निमकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) २९,४२८
प्रभाकर दिवे (शेतकरी संघटना) १६,३१९

लोकसभा २०१९
बाळू धानोरकर (काँग्रेस) - १०९१३२ आघाडी ३५,२५२
हंसराज अहिर (भाजप) - ७३८८०
राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन) - २४४८०