Raju Shetti on Devendra Fadnavis: खरंच तुम्हाला मराठवाडा, विदर्भाचा विकास करायचा असेल तर सध्या भुसंपादनासह अस्तित्वात असलेला रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे सहा किंवा आठपदरीकरण करा. या महामार्गास  जोडणाऱ्या 12 जिल्ह्यातील राज्य महामार्गांची सुधारणा करा. नागपूरपासून ते कोकणपर्यंत शक्तीपीठ महामार्गापेक्षाही वाहतूकीसाठी शीघ्रगतीने जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा. नागपूर , नांदेड , परभणी, सोलापूर, सांगोला, मिरज, कोल्हापूर ते वैभववाडी ही विदर्भ ते कोकणाला जोडणारी प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेसेवा गतीमान करा. मात्र, मुठभर लोकांच्या हितासाठी ढीगभर जनतेला वेठीस धरू नका, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही स्थितीत शक्तिपीठ करण्यासाठी सुतोवाच करण्यात येत आहेत. यासाठी सर्वाधिक टोकाचा विरोध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून वळसा सुद्धा घालण्याची तयारी केली जात आहे. मात्र, यामुळे शक्तिपीठ नाव असूनही करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा, नरसोबावाडी आदी ठिकाणांना काही फायदा होणार नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा नव्हे, तर राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विनाशाचा मार्ग ठरणार आहे, असा घणाघात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गाविरोधात इशारा देत असतानाही सरकारने कोणताही खुलासा न करता हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर जनतेच्या दबावापुढे मुख्यमंत्री मार्ग बदलण्यास भाग पाडले गेले, असे शेट्टी म्हणाले.

पुढील 90 वर्षे जनतेवर टोलचा भुर्दंड 

ते म्हणाले की, रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याच्याच समांतर शक्तीपीठ महामार्ग उभारणे म्हणजे दोन्ही मार्ग तोट्यात घालून राज्यावर प्रचंड आर्थिक बोजा टाकण्यासारखे आहे. हा महामार्ग पुढील 90 वर्षे जनतेवर टोलचा भुर्दंड लादणारा असून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलणारा ठरेल, असा शेट्टींचा आरोप आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराच्या वेढ्यात अडकवणे, १२ जिल्ह्यांतील सुपीक बागायती शेती उद्ध्वस्त करणे आणि पर्यावरणाचे लचके तोडणे हे या प्रकल्पाचे अपरिहार्य परिणाम असतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Continues below advertisement

803 किलोमीटर लांबीसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपये खर्च 

शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावर शेट्टींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने नाशिक ते अक्कलकोट या 374 किलोमीटर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी 19,142 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्याचा प्रतिकिलोमीटर खर्च सुमारे 51 कोटी रुपये येतो. मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी 803 किलोमीटर लांबीसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे, म्हणजे प्रतिकिलोमीटर 124 कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. दोन्ही महामार्ग सहापदरी असताना शक्तीपीठ महामार्गासाठी प्रतिकिलोमीटर 73 कोटी रुपयांचा जादा खर्च का केला जात आहे, हा भार राज्यातील जनतेने का सहन करायचा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल

हा महामार्ग केवळ विकासासाठी नसून, गौण खनिज वाहतूक, गडचिरोलीतील खनिज, काही स्टील कंपन्यांची वाहतूक आणि त्यातून होणाऱ्या 60 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचारासाठीच रेटला जात असल्याचा आरोप शेट्टींनी केला. देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून हा महामार्ग पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर सरकारचा हेतू खरोखर स्वच्छ असेल, तर सर्वप्रथम समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करून त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम जनतेसमोर मांडावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. त्यानंतरच शक्तीपीठ महामार्गावर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या