Nanded Municipal Election 2026: निवडणुकांच्या काळात मतदारांची मते मिळवण्यासाठी उमेदवारांकडून मोठमोठी आश्वासने दिली जातात. शहराच्या विकासाचे आराखडे, जाहीरनामे, आकर्षक घोषणा हे सगळे आपण नेहमीच पाहतो. मात्र नांदेड महापालिका निवडणुकीत (Nanded Municipal Election 20226) एका महिला उमेदवाराने प्रचाराची अगदीच वेगळी आणि लक्षवेधी पद्धत अवलंबली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवाराने थेट शासकीय बाँडवर लिहून देत, वचनपूर्ततेची हमी दिल्याने राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य मतदारांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Nanded Municipal Election 2026: शासकीय बाँडवर लिहून दिली विकासाची हमी
नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या नीता जैन (Neeta Jain) या महिला उमेदवाराने मतदारांसमोर एक अनोखा आणि धाडसी प्रस्ताव ठेवला आहे. नीता जैन यांनी शासकीय बाँडवर स्पष्ट शब्दांत लिहून दिले आहे की, निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यात अपयशी ठरले, तर त्या आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतील.
Nanded Municipal Election 2026: मतदारांमध्ये चर्चेचा विषय
आजवर अनेक उमेदवारांनी घोषणाबाजी केली, जाहीरनामे प्रसिद्ध केले, पण प्रत्यक्षात काम किती झालं यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. अशा पार्श्वभूमीवर, शासकीय बाँडवर लिहून दिलेलं हे आश्वासन सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या अनोख्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक १६ मध्येच नव्हे, तर संपूर्ण नांदेड शहरात नीता जैन यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नीता जैन यांच्या या पावलामुळे नांदेड महापालिका निवडणुकीत आश्वासनांच्या राजकारणाला नवा आयाम मिळाल्याचं चित्र आहे. आता नीता जैन यांची रणनीती मतदारांना कितपत आकर्षित करणार? याचे चित्र 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
Nanded Municipal Election 2026: 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणूक रिंगणात
दरम्यान, नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित राष्ट्रीय पक्षच नव्हे, तर तब्बल 14 प्रादेशिक पक्ष आणि विविध आघाड्यांनीही जोरदार तयारी करत शड्डू ठोकला आहे. एकूण 81 जागांसाठी तब्बल ४९१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी उमेदवार सभा, कोपरा सभा, पदयात्रा तसेच वैयक्तिक गाठीभेटींवर विशेष भर देत आहेत. शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या मोठ्या पक्षांसोबतच यंदा प्रादेशिक पक्षांनीही जातीय आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा