किमान उत्पन्न योजनेअंतर्गत सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली. हे न्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून (न्यूनतम आय योजना - NYAY) असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. याचा थेट फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होण्याचा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केला.
एखाद्या कुटुंबाला सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी 12 हजार रुपयांची आवश्यकता असल्याचं असं राहुल गांधींनी सांगितलं. यासाठी त्यांनी देशातील गरीब कुटुंबाला मासिक 12 हजार उत्पन्नाची हमी दिली आहे. या 12 हजार रुपयांचं उत्पन्न कसं पूर्ण होणार हे देखील त्यांनी सांगितलं. समजा, एका कुटुंबाचं उत्पन्न महिना 5 हजार रुपये आहे, तर या योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला 7 हजार रुपये मिळतील. जर कुटुंबाचं उत्पन्न 10 हजार रुपये असेल त्यांना दोन हजार रुपये मिळणार. हा फरक थेट बँक खात्यात जमा होईल. पण हे सगळं काँग्रेस सत्तेत आल्यावर होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेस, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. आता आमचं सरकार आल्यास किमान उत्पन्नाचं आश्वासनही पूर्ण करु.
तसंच मोदी केवळ अनिल अंबानी यांच्यासारख्या लोकांचीच मदत करतात, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, काँग्रेस पक्ष उद्या निवडणुकीचा जाहीरनामा घोषित करणार आहे. त्याच्या एक दिवस आधी राहुल गांधींनी ही मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात "राईट टू हेल्थ"चाही दावा करु शकतं.
VIDEO : राहुल गांधींची पत्रकार परिषद