अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री अचानक भाजप खासदार दिलीप गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विखे आणि दिलीप गांधी यांच्यात जवळपास तासभर बंद खोलीत चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपने 'आयाराम' सुजय विखेंना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली.

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विखे आणि दिलीप गांधींच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. 'दिलीप गांधी आणि आमचे घरगुती संबंध आहेत. हे माझंच घर आहे' अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी भेटीनंतर दिली.

दरम्यान, सुवेंद्र गांधी यांना तरुणवर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्याची समजूत काढून तो पक्षाचं काम करण्यास तयार होईल, असं वातावरण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं दिलीप गांधींनी सांगितलं.