Punjab Election Result 2022 : या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले असून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आपच्या अजीतपाल सिंह कोहली यांनी तब्बल 15000 हून अधिक मतांनी धुळ चारली आहे. विशेष म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ म्हणजे पटियाळातून झाला आहे, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.


कोण आहेत अजितपाल सिंह कोहली?
अजीतपाल सिंह कोहली हे आपचे पटियाळा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांनी माजी मुख्ममंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा 15 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. ते यापूर्वी शिरोमणी अकाली दल या पक्षामध्ये होते. नंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला.


अजितपाल सिंह हे यांनी 2011 साली पटियाळाचे महापौर म्हणून काम केलंय. त्यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील सुरजीत सिंह कोहली हे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले आहेत. 


कॅप्टन अमरिंदर सिंह हे 2017 सालच्या निवडणुकीमध्ये पटियाळा शहर विधानसभा मतदारसंघामधून 52,407 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी 2017 साली आपच्या डॉ. बलबीर सिंह यांचा पराभव केला होता. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पटियाळा मतदारसंघातून 2002, 2007, 2012 आणि 2017 असं सलग चारवेळा निवडणूक जिंकली होती.


कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पराभव स्वीकारला
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एक ट्वीट करुन आपला पराभव स्वीकार केला आहे. ते म्हणाले की, "लोकांचा निर्णय मी विनम्रपूर्वक स्वीकार करतो. पंजाबी लोकांनी धार्मिकता आणि जातीयवादाच्या पलिकडे जाऊन मतदान केलं आणि पंजाबियांची खरी भावना व्यक्त केली."


संबंधित बातम्या: