पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार हे जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यालाच मतदान करा असा आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेले पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. VIDEO | प्रचारादरम्यान नागरिकांच्या रोषापुढे गिरिश बापट हतबल | पुणे | एबीपी माझा पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट हे पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत असताना तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं. आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत मात्र आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही आता आम्ही मतदान का करावे? असा प्रश्न उपस्थित करत या परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे आता आम्हाला जर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे? असा थेट प्रश्न नागरिकांनी बापटांना विचारला आहे. दरम्यान नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट चांगलेच अडचणीत आले. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला यावेळी त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.