दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने किंग्स इलेव्हन पंजाबला पाच विकेट्सनी धूळ चारुन गुणतालिकेतलं आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. दिल्लीचा यंदाच्या आयपीएलमधला हा सहावा विजय ठरला. या सामन्यात पंजाबनं दिल्लीला 164 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान पाच विकेट्स राखून पार केलं.


कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवननं अर्धशतकं झळकावून दिल्लीचा विजय सोपा केला. अय्यरनं 49 चेंडूत नाबाद 58 धावा फटकावल्या तर शिखर धवनननं 41 चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह 56 धावांचं योगदान दिलं. पृथ्वी शॉ पुन्हा एकदा मोठी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने 13 केल्या, तर कॉलिन इनग्रामने 19 धावा केल्या.


त्याआधी ख्रिस गेलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन 164 धावा केल्या. गेलनं यंदाच्या आयपीएलमधील चौथं अर्धशतक झळकावलं. त्याने 37 चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह 69 धावा फटकावल्या. पण त्यानंतर पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.


त्यामुळे पंजाबला सात बाद 163 धावांचीच मजल मारता आली. दिल्लीकडून संदीप लमिछानेनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर कगिसो रबाडा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली.