सांगली : नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तर काश्मीरचा प्रश्‍न सुटेल, असे वक्तव्य पाकिस्तानचा प्रधानमंत्री इम्रान खानने केले होते. मोदींना प्रधानमंत्री करा, असे सांगणारे इम्रानखान कोण? मोदी, शाह इम्रान खानच्या या वक्‍तव्यावर का बोलत नाहीत? असा सवाल करत नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या 'भेटीगाठी' आम्ही बाहेर काढू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत दिला आहे.


वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीत  सभा झाली. यावेळी आंबडेकर बोलत होते.  मालेगाव बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन भाजपने शहीदांचा अपमान केला आहे. लोकशाहीविषयी घृणा निर्माण केली आहे, अशी घणाघाती टीका देखील  प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या ‘भेटीगाठी’ बाहेर काढू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.  ‘आरएसएस’ ही दहशतवादी संघटना आहे. ‘आरएसएस’ या संघटनेला हत्यारे कशासाठी पाहिजेत. ‘आर्मीकडे असणारी सर्व हत्यारे ‘आरएसएस’कडे कशी? असा सवाल आंबडेकर यांनी उपस्थित केला.

वंचित बहुजन आघाडीला विरोधकांकडून भाजपची ‘बी’ टीम म्हटले जात आहे. पण ही वंचित आघाडी ‘ए’ टीम आहे. प्रस्थापित आता विस्थापित होणार आहेत. वंचित बहुजन सत्तेत येणार आहेत, असेही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले. मात्र, भाजपने जिल्ह्याचा अवमानच केला. त्यामुळे भाजपला आता जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपचे उमेदवार संजय पाटील, स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी कारखाने मोडीत काढले आहेत. संजय पाटील आणि विशाल पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.