मुंबई : लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) उपचारासाठी कुठले औषध मागवलं त्याचं नाव अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगावं,असा सवाल गिरीश महाजनांनी केला आहे. लक्ष्मण जगताप आजारी असताना फडणवीसांनी औषधांची व्यवस्था केली होती. खोटे बोलणं अजित पवारांकडून अपेक्षित नाही असे म्हणत गिरीश महाजनांनी टीका केली आहे.

  


लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची परदेशातून मी व्यवस्था केली असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाषणादरम्यान केले होते. मात्र अजित पवारांचे हे भाषण ऐकून आपल्याला शॉक बसला असल्याचे आणि खोटे बोलत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.  लक्ष्मण जगतापांसाठी अजित पवारांनी कुठले औषध मागवलं असेल तर त्यांनी  त्याच एखादे नाव सांगावं असा सवालही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.


खोटे बोलणे अजित पवारांकडून अपेक्षित नाही


दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी आपण व देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रांच्या माध्यमातून अमेरिकेतून औषधांची व्यवस्था केली होती. मात्र  अजित पवारांकडून असे वक्तव्य हे गंभीर आहे.  खोटे बोलणे अजित पवारांकडून अपेक्षित नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले  आहे.


जगताप हे आजारी असतांना मी त्यांना औषधं दिली : अजित पवार


चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला, अजित पवार म्हणाले, लक्ष्मण जगताप यांना भाजपने आपल्या स्वार्थासाठी मतदान करण्यासाठी नेले. त्यामुळेच त्यांची दगदग झाली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना मतदानासाठी घेऊन जायला नको होतं. जगताप हे आजारी असतांना मीच त्यांना महागडी इंजेक्शनं आणि औषध आणून दिली होती. त्यावर गिरीश महाजनांनी वक्तव्य केले.


ऑक्सिजन लावून गिरीश बापटांना प्रचारात उतरवणं योग्य आहे का? 


गिरीश बापट सध्या आजारी आहेत. तरी देखील ऑक्सिजन लावून त्यांना प्रचारात उतरवलं जात आहे. आजारी माणसाला अशा पद्धतीने प्रचारात उतरवणं योग्य आहे का? पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा याचा विचार व्हायला  नको का? त्यांना ऑक्सिजन लावून प्रचाराला आणलं गेलं. अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Pune Bypoll election : 26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना शॉक द्या: चंद्रशेखर बावनकुळे