सांगली : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीट न दिल्यास भाजपमध्ये या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ही ऑफर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वसंतदादा पाटील घराण्याची वाट लावली आहे.'


चंद्रकांत पाटील प्रतीक पाटलांना उद्देशून म्हणाले की, "तुम्हाला काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले तर तुम्ही ही निवडणूक जरुर लढा, परंतु तुम्ही ही निवडणूक हरणार. तुमच्या पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले नाही तर स्वाभिमानाने पक्षातून बाहेर पडा. भारतीय जनता पक्ष पायघड्या घालून तुमचं स्वागत करेल."

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या ऑफरनंतर विविध राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. चंद्रकांत पाटलांची ऑफर स्वीकारुन प्रतीक पाटील भाजपत जातात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.