मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अजून एका नेत्याचा बायोपिक येत आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक सुभाष कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून उलाला गर्ल विद्या बालन या चित्रपटात मायावतींची भूमिका साकारणार आहे.


मायावतींच्या भूमिकेसाठी बऱ्याच नावाजलेल्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा केल्यानंतर दिग्दर्शकाने विद्या बालन हिची या भूमिकेसाठी निवड केली आहे. विद्यानेदेखील या भूमिकेसाठी होकार दिला असल्याचे वृत्त आहे. ती सध्या मायावतींबद्दल वाचन करत आहे. मायावतींच्या बायोपिकबाबत उत्तर प्रदेशसह देशभरातील त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

वाचा : jayalalitha biopic : 'ही' अभिनेत्री साकारणार जयललिता यांची भूमिका

राजकीय नेत्यांवर चित्रपट बनवण्याची सध्या स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 'ठाकरे', मनमोहन सिंह यांच्यावर 'दी : अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'पीएम नरेंद्र मोदी', दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि नेते नंदामुरी तारका रामा राव (एटीआर)यांच्यावर 'एनटीआर' हे चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यात आता मायावतींच्या बायोपिकची भर पडणार आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचादेखील बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे.