सोलापूर शहरात 14 ठिकाणी आणि ग्रामीण भागात 22 ठिकाणी ईव्हीएम चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. आमचं चिन्ह चौथ्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी चौथ्या क्रमांकावर बटन दाबलं जात नाहीये, तर काही ठिकाणी कुठलंही बटन दाबलं तरी कमळाच्या चिन्हाला मत जात आहे, असा दावा सुजात आंबेडकरांनी केला. सत्ता हातातून जात आहे, म्हणून नरेंद्र मोदी घाबरले आहेत. त्यामुळे ते असे गैरव्यवहार करत आहेत, असा घणाघातही सुजात यांनी केला.
काही ठिकाणी अर्धा ते पाऊण तास उशिरा मतदान होत आहे. आमचे पोलिंग बूथ कमिटी, मतदार स्वतः कॉल करुन तक्रार करत आहेत. आम्ही आता स्वतः त्या बूथ्सवर जाऊन माहिती घेत आहोत, असं सुजात आंबेडकरांनी सांगितलं.
'पारंपरिक मतदार' यावर माझा विश्वास नाही. मतदाराला स्वतःची विचार क्षमता आहे. तो काळ, वेळ आणि उमेदवार बघून मतदान बदलत राहतो. सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचे आरोप त्यांच्याकडे ठेवावेत, ईव्हीएम बिघाड थांबवला तर जगाला निकाल काय आहे ते कळेल, असंही सुजात म्हणाले.
दरम्यान, सुजात आंबेडकरांपाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही 'वंचित'च्या चिन्हसमोरील बटन दाबल्यास कमळाला मत जात असल्याचा आरोप केला. तक्रार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशिन सील केल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. कुठलीही मशीन 100% बरोबर असूच शकत नाही, त्यामुळे सगळे बॅलेट पेपरची मागणी करत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.
सुजात आणि प्रकाश आंबेडकर यांचे आरोप निराधार असल्याचं सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. आंबेडकर यांनी तक्रार केल्याप्रमाणे कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही. ईव्हीएमचं कुठलंही बटन दाबलं तर कमळाला मत जातंय अशी तक्रार आली नाही. 49 MA नियमानुसार मतदारांना तक्रार नोंदवण्याची तरतूद आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.