मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात १० लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातून अनेक ठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया विलंबाने सुरु झाली.

VIDEO | लातूर आणि उस्मानाबादमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडलं | एबीपी माझा



हिंगोली : हिंगोली तालुक्यातील बासंबा मतदान केंद्रावर खोली क्रमांक एक मध्ये ईव्हीएममशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 41 मिनिट ईव्हीएम मशीन बंद पडली. तब्बल 41 मिनिटांनंतर मशीन सुरळीत झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरुळीत  सुरु झाली.


अकोला : अकोला नजीकच्या गुडधी येथे व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड. अर्धा तासाच्या दुरूस्तीनंतर व्हीव्हीपॅट मशीन सुरु झाली.

अकोला : बाळापूर मतदार संघातील रिधोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 120 मधील मतदान यंत्र तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती.


बीड : बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील मोहखेड बुथ क्रमांक 312 मध्ये मशिनमध्ये बिघाडामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया होऊ शकली नाही. तर जिल्ह्यातील मोहखेडमध्ये 8.43 पर्यंत मतदान सुरू झाले नव्हते.



सोलापूर : सोलापुरातील बुधवार पेठ परिसरातील वडार गल्ली येथील लक्ष्मण महाराज प्रशालेमध्ये मतदान केंद्रावर अर्धा तास तर हत्तुरे वस्ती येथील मतदान प्रक्रिया अर्धा तास उशिराने सुरू


उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गुंजोटी आणि उस्मानाबाद शहर मतदान केंद्र 296 या दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले होते. अर्ध्या तासाच्या विलंबाने मतदान सुरु झाले.

नांदेड :  नांदेड जिल्ह्यात  78  EVM मशीन खराब झाल्या होत्या त्या बदलण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरुळीत सुरु झाली.



राज्यात दहा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होत आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा 12 उमेदवार, अकोला 11 उमेदवार, अमरावती 24 उमेदवार,  हिंगोली  28 उमेदवार, नांदेड 14 उमेदवार,  परभणी 17 उमेदवार, उस्मानाबाद 14 उमेदवार आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.