मी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव आणला जातोय : रामदास माने
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2019 11:11 PM (IST)
'टॉयलेट मॅन' म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत. परंतु त्यांच्यावर उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव आणला जात आहे.
मुंबई : 'टॉयलेट मॅन' म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत. परंतु त्यांच्यावर उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव आणला जात असल्याची, खळबळजनक माहिती माने यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दिली आहे. रामदास माने म्हणाले की, "मी ज्या दिवशी माढा लोकसभेतून माझा उमेदवारी अर्ज भरला, त्या दिवशीच माझ्यावर उमेदवारी अर्ज भरु नये यासाठी दबाव आणला जात होता. परंतु तरिही मी अर्ज भरला. अर्ज भरला त्या दिवसापासून दररोज 10-15 माणसं माझ्याकडे येतात आणि उमेदवारी अर्ज मागे घ्या असे मला सांगतात. परंतु मी अर्ज मागे घेणार नाही." माने म्हणाले की, मी खूप छोटा माणूस आहे. तरीसुद्धा मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी माझ्यावर प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. यावरुन मला एक गोष्ट समजली आहे की, लोक मला घाबरत आहेत. जुन्या पक्षाचे नेते सर्वत्र झेंडे बदलून उभे आहेत. अशा परिस्थितीत मी माढ्यात चमत्कार करुन दाखवण्याचे वचन देत निवडणुकीत उभा राहिलो आहे, त्यामुळे मी निवडून येईन असे मला वाटते. कोण आहेत रामदास माने? संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लान्ट आणि मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 हजार टॉयलेट्स पुरवली आहेत. माने यांनी 25 नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता. VIDEO | लोकसभेचे उमेदवार रामदास माने आणि डॉ. अनिल कुमार यांच्याशी खास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा