पाटणा : राफेल व्यवहारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, राफेलप्रकरणी तपास होईल, त्यामुळे सत्य समोर येईल, त्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानीला शिक्षा होईल.

राहुल म्हणाले की, "कोणीही वाचणार नाही, अखेर एक दिवस राफेलप्रकरणी तपास होईल, त्यामुळे सत्य समोर येईल. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांना शिक्षा होईल. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी, बिहारची जनता आणि देशातले नागरिक मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत. ही परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. आजकाल मोदींना पाहिल्यानंतर लक्षात येते की ते किती घाबरलेले आहेत."

VIDEO | राहुल गांधींची अमेठीतून उमेदवारी रद्द करा : भाजप | एबीपी माझा



बिहारच्या सुपौलमध्ये कांग्रेसतर्फे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "बिहारचे तरुण संपूर्ण देशभरात जाऊन बँकांसमोर, सरकारी इमारतींबाहेर तसेच अन्य कार्यालयांबाहेर चौकीदारी करतात. बिहारचे युवा पूर्ण इमानदारीनिशी चौकीदारी करतात. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणवतात, परंतु ते केवळ अंबानीची चौकीदारी करतात."

राहुल म्हणाले की,  "नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व चौकीदारांना बदनाम केले आहे. बिहारमधील तरुण उन्हातान्हात, अर्धी भाकरी खाऊन चौकीदारीचे काम करतात. परंतु एका व्यक्तीने त्यांना बदनाम केले आहे."