कल्याण : शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी दत्तक घेतलेल्या गावातच सुविधांची वानवा असल्याचं वास्तव समोर आलंय. महाआघाडीच्या प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या.


कल्याण ग्रामीण भागातील शिरढोण गाव हे आमदार सुभाष भोईरांनी दत्तक घेतलं आहे. मात्र या गावात साधे रस्ते, पिण्याचे पाणी याचीदेखील सुविधा पोहोचलेली नाही. आज कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे प्रचारासाठी ग्रामीण भागातील गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिरढोण गावाला भेट दिली असता दगडांनी, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि पाण्याची रिकामी भांडी यांनी त्यांचं स्वागत केलं.


याठिकाणी जिल्हा परिषदेपासून आमदार, खासदारापर्यंत सगळे शिवसेना भाजपचे असताना आणि त्यातही हे गाव आमदारांनी दत्तक घेतलेलं असताना ही अवस्था असेल, तर हा करंटेपणा असल्याची टीका यावेळी बाबाजी पाटील यांनी केली. तसंच पुढच्या वेळी या निष्क्रिय लोकांना निवडून देताना विचार करण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं.