वाराणसी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा वाराणसी दौरा वादात सापडणार असल्याचं दिसत आहे. वाराणसीमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांका गांधीनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण केला होता. पण संपूर्ण वाद या पुष्पहार अर्पण केल्यानेच झाला आहे.

प्रियांका गांधींनी आपल्या गळ्यातील पुष्पहारच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला अर्पण केला. यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर भाजप यावरुन प्रियांका गांधींवर जोरदार हल्लाबोल करत आहे. दुसरीकडे काँग्रेसने याबाबत सध्या कोणतीही टिप्पणी केलेली नाही. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
तीन दिवसांच्या गंगा यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात प्रियांका गांधी वाराणसीमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रियांका गांधींनी आपल्या गळ्यातील गुलाबाचा हार माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याला अर्पण केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी नाराजी दर्शवली आहे. तर हा माजी पंतप्रधानांचा अपमान असल्याची टीका  भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

स्मृती इराणींचं टीकास्त्र
प्रियांका गांधी यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपचे नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे. स्मृती इराणी यांनी ट्वीट करुन लिहिलं आहे की, "मुंडी झुकाइएके सर झटकाइएके, गुमान में बिटिया भूल गई मरजाद, आपन गले की उतरन, पहनाए दीहिन, शास्त्री जी के अपमान पर ताली बजाएके, हाथ हिलाइएके, चल दीहलें कांग्रेस बिटिया तोहार"

पाहा व्हिडीओ