मुंबई : आगे आगे देखो होता है क्या? असं म्हणणाऱ्या भाजपनेत्यांच्या सूचक विधानं प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन मोठे धक्के दिल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात.
अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका घेतल्यापासून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.

नुकताच काँग्रेसचा इंदापूरमध्ये मेळावा झाला होता. या मेळाव्याला पृथ्वीराज चव्हाण  मेळाव्याला उपस्थित होते. या संपूर्ण मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर जबरदस्त टीका करण्यात आली होती. नुकताच रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यावरही इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.

भाजपाकडून उमेदवारीचं आश्वासन मिळाल्यावरच हर्षवर्धन भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

कोण आहेत हर्षवर्धन पाटील?
- इंदापूरचे काँग्रेस नेते
- काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील यांचे पुतणे
- चार वेळा इंदापूरचे (बावडा) आमदार
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सहकारमंत्री
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्याकडून पराभव
- इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला न सोडण्याचा अजित पवारांचा निश्चय, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाची शक्यता

दरम्यान, मला तिकीटाची चिंता नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या शक्यतांचा इन्कार केला.