'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला U सर्टिफिकेट, 'या' दिवशी प्रदर्शित होणार
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2019 10:00 AM (IST)
पंतप्रधान मोदींच्या बायोपिकला लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाचाच मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच गुरुवार 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट मिळालं आहे. हा चित्रपट 130 मिनिटं (दोन तास दहा मिनिटं 53 सेकंद) लांबीचा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या बायोपिकला लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाचाच मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच गुरुवार 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असं मत सुप्रीम कोर्टाने मांडलं होतं. तसेच कोर्टाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचंही म्हटले होतं. 'तुमचे आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो. तुमचे विनम्र आभार. लोकशाहीवरील विश्वास दृढ केल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार. गुरुवार, 11 एप्रिल. जय हिंद.' असं ट्वीट विवेक ओबेरॉयने केलं आहे. विशेष म्हणजे #PMNarendraModiWins असा हॅशटॅगही विवेकने जोडला आहे. 'लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होणं, हा निव्वळ योगायोग आहे. गेल्या 18 वर्षांत मी 45 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. 26-27 पुरस्कारही जिंकले आहेत. मला मोदींना हिरो बनवण्याची गरज नाही. ते जगभरातील कोट्यवधी लोकांचे हिरो आहेत' अशी स्तुतिसुमनंही विवेकने मोदींवर उधळली. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट जशोदाबेन, तर अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.