सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर चर्चेत होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.  दीपक चव्हाण यांना अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर करुन देखील ते पक्ष बदलत आहेत. फलटणमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळं तालुक्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दीपक चव्हाण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 


रामराजे यांचं फलटणवर वर्चस्व 


फलटण विधानसभा मतदारसंघावर रामराजे नाईक निंबाळकर याचंं वर्चस्व राहिलं आहे. 2009 पूर्वी हा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ते या मतदारसंघाचे आमदार होते.  2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर फलटण हा अनूसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ झाला.  2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण विजयी झाले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास दीपक चव्हाण चारवेळा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे पहिले आमदार ठरतील. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये दीपक चव्हाणांसमोर वेगवेगळ्या उमेदवारांनी लढत दिली होती. या मतदारसंघात सलग तीनवेळा दीपक चव्हाण विजयी झाले.   


लोकसभेला मतदारसंघात काय घडलं? 


फलटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झाली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. मात्र, फलटण मतदारसंघातून निंबाळकर यांनी आघाडी घेतली. फलटण मतदारसंघात त्यांना 110561 मतं मिळाली होती. तर, धैर्यशील मोहिते पाटील यांना 93633 मतं मिळाली होती.  


दीपक चव्हाण यांच्यासमोर कुणाचं आव्हान?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी फलटण विधानसभा मतदारसंघातून दीपक चव्हाण यांना फोनवरुन उमेदवारी जाहीर केली होती. सिटींग गेटिंगनुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता होती. आता दीपक चव्हाण यांच्या विरुद्ध अजित पवार कुणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागेल. भाजपनं देखील या मतदारसंघात तयारी सुरु केली असून जागावाटपात ही जागा कुणाकडे जाणार हे पाहावं लागेल. भाजपकडून सचिन कांबळे पाटील या मतदारसंघातून तयारी करत आहेत. 


इतर बातम्या :



'लाडकी बहीण'ला काँग्रेसचं 'महालक्ष्मी योजने'ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार, महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात काय काय?