परभणी : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. मात्र विधानसभेच्या तोंडावरच परभणीमध्ये (Parbhani News) महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
परभणी विधानसभेची जागा मित्र पक्षाला न सोडता भाजपला सोडण्यात यावी आणि पाथरीची जागा भाजप ऐवजी शिवसेनेला सोडण्यात यावी, अशी मागणी परभणीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय जर असं झालं नाही तर भाजपचे पदाधिकारी शिवसेना असो की राष्ट्रवादी यांचे काम करणार नसल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. तसेच वरिष्ठ नेत्यांना भेटूनही त्यांच्यासमोर ही मागणी करणार असल्याचेही या नेत्यांनी ठरवले आहे. त्यामुळे आता शिवसेनेची काय भूमिका ठरते? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
परभणीची जागा भाजपला तर पाथरीची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी
परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेतेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाथरी विधानसभेची भाजपची जागा ही शिवसेनेला सोडण्यात यावी आणि परभणीची जागा ही शिवसेनेऐवजी भाजपला सोडण्यात यावी, परभणीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्याच अनुषंगाने ही जागा जर मित्र पक्षाला सोडली तर मित्र पक्षाचे काम न करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. त्यामुळे महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच वाद पाहायला मिळत आहे. आता महायुतीतील वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आचारसंहिता कधी लागणार?
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या