भुवनेश्वर : भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकला एक महिना उलटला असला तरी पाकिस्तान अद्याप दहशतवाद्यांचे मृतदेह मोजत आहे. परंतु भारतात विरोधी पक्ष मात्र त्याचे पुरावे मागत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. आज सायंकाळी ओडिशात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एअर स्ट्राईकचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.


तुम्हाला दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारणारं सरकार हवं आहे, की मान खाली घालून घाबरणारं सरकार हवं? असा सवाल करत मोदींनी जनतेला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मोदी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ओडिशाने एक ऐतिहासिक गोष्ट अनुभवली आहे. भारत आता अंतराळातही चौकीदारी करण्यासाठी सक्षम झाला आहे. ही नव्या भारताची ताकद आहे, ज्यावर संपूर्ण भारताला गर्व आहे. ज्या लोकांना भारताचा हा पराक्रम लहान वाटतो, त्यांना देश सध्या पाहतोय. 60 वर्ष देशातल्या गरीबांना धोका देणारे लोक विचलित होऊन देशाचे लष्कर, वैज्ञानिक, आणि तरुणांच्या सामर्थ्यावर संशय व्यक्त करत आहेत.