मुंबई : मुंबई आयआयटीच्या एरोस्पेस डिपार्टमेंटमध्ये आज दुपारच्या सुमारास  प्रयोग करताना झालेल्या स्फोटात 3 जण जखमी झाले आहेत. दुपारी 12.30 च्या दरम्यान हा स्फोट घडला. यामध्ये प्रशांत जाधव, तुषार जाधव आणि रजत जैस्वाल हे जखमी झाले आहेत.

आयआयटी मुंबईच्या ऐरोस्पेस विभागात सदर प्रयोग केला जात होता. या प्रयोगादरम्यान आयआयटी मुंबई एरोस्पेस विभागाचे माजी विद्यार्थी तुषार जाधव आणि इतर दोन प्रशिक्षणार्थी प्रयोग करत असताना फुग्यामध्ये हायड्रोजन भरत होते. हे हायड्रोजन भरत असताना फुगा फुटला आणि जोरदार स्फोट झाला.

या घटनेत तुषार जाधव यांच्यासह प्रशांत जाधव आणि रजत जैस्वाल जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या आयआयटी मुंबई रुग्णालयात प्रथमोपचार करुन नेशनल बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून पुढील उपचार सुरु आहेत. दरम्यान हे तिघेही सुखरूप असून यांना उपचार करुन डिस्चार्ज दिला जाईल, असे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले आहे.

तुषार जाधव हे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी असून मुंबई आयआयटीमध्ये ते एका प्रोजेक्टचे काम करत आहेत. यासाठी त्यांनी काही प्रशिक्षणार्थींना या प्रोजेक्टसाठी सोबत घेतले होते.