मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करणारा राष्ट्रवादी पक्ष गुजरातमध्ये मात्र स्वबळावर निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे. गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी सर्व लोकसभा मतदारसंघात लढण्याची माहिती दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसात राष्ट्रवादी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र काँग्रेससोबत आघाडीची बोलणी ठोस मुद्द्यावर पोहचत नसल्याने राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपने लोकसभेच्या सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या होत्या.

जागावाटपासाठी राष्ट्रवादीने पोरबंदर, पंचमहाल, गांधीनगर या मतदारसंघांची मागणी केली होती. गांधीनगरमधून भाजपचे पारंपरिक उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी अध्यक्ष अमित शाह रिंगणात उतरणार आहेत. पोरबंदरमधून रमेश धाडूक निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या गोटात सामील झालेल्या रतन सिंग यांना पंचमहालमधून उमेदवारी देण्यात आली आहे.