अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारातोफा धडाडत असून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम मुद्दा ऐन निवडणुकीत समोर आलाय. तर, देशपातळीवरील नेतेही महाराष्ट्रात प्रचाराला येत आहेत, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावतीमध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा होत असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी येथील व्यासपीठावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींवर पलटवार केला आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा 15 मिनिटांचा पुर्नउच्चार केला. ओवैसी यांनी प्रचाराच्या त्यांच्या पहिल्या भाषणात वेळेचा उल्लेख करताना ते म्हणाले, 10 वाजताची वेळ आहे. आता 9.45 वाजतायत. अजून 15 मिनिट उरले आहेत. सभेला आलेल्या लोकांना ते म्हणाले, अरे भाई.. 15 मिनिट उरले आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना ते माझा सोडणार... चल रही है मगर क्या गूंज है." असं अकबरुद्दीन म्हणाले होते. त्यावरुन, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पलटवार केलाय.
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणाने पुन्हा एकदा ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन ओवैसींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता योगी आदित्यनाथ यांच्यासमोर भाषण करताना अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिलाय. ''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद बाकी आहेत, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणांनी अकबरुद्दीन ओवैसींना इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ मंगळवारी संभाजीनगरमध्ये ओवैसी बंधूंची सभा होती. त्यावेळी, सभेत बोलातना छोटे ओवेसी म्हणाले की, मेरी घडी मे पावणे दस हो रहे, अब सिर्फ 15 मिनिट बाकी है.. त्यावरुन नवनीत राणांनी अकबरुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. अरे तू हैदराबादवरुन आला आणि सांगतो की माझ्या घड्याळात 15 मिनिट बाकी आहेत अरे माझ्या घडीत फक्त फक्त 15 सेकंद आहेत,'' अशा शब्दात नवनीत राणा यांनी ओवैसींना पुन्हा इशारा दिला आहे.
भाषणात ओवैसी काय म्हणाले
भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्त्व शिकवण्यात यशस्वी झाले का? राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना सेक्युलर शिकवण्यात यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का? यांना फक्त सत्ता आणि सत्तेची गादी पाहिजे, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते.
एमआयएमचे 16 जागांवर उमेदवार
AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे सलग 6 वेळा तेलंगणातील चंद्रयांगुट्टा येथून आमदार आहेत. एमआयएम महाराष्ट्रात 16 जागांवर निवडणुक लढवत आहे. त्यासाठी आता एमआयएमने त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. औरंगाबाद पूर्वचा प्रचार करण्यासाठी ते मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये MIM ने महाराष्टात 44 उमेदवार उभे केले होते. त्यातील दोन जागांवर ते निवडून आले होते.