Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच मराठा उपोक्षणकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 


मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा मोर्चा मुंबईत आला होता, तेव्हा व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते बसले होते. यावेळी चारही पक्षांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मग आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी मराठा समाजाचे इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात कधी पाहिले नव्हते, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याची भूमिता जाहीर केली. यावर राज ठाकरे यांनी आज लातूरमधील जाहीर सभेत भाष्य केलं आहे. 


राज ठाकरे काय म्हणाले?


मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे उपोक्षणाला बसले. त्यानंतर ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुका लढवणार...मग काही दिवसांनी सांगितले, निवडणूक लढवणार नाही, पाडापाडी करणार...तुम्हाला निवडणुका लढवायची असेल तर लढवा, पाडायचं असेल तर पाडा...पण प्रश्न इतकाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, येवढं मला फक्त सांगा...असं राज ठाकरे म्हणाले.


कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही- राज ठाकरे


मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्यापुरता नसून देशभराचा विषय आहे. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या जातीचे प्रश्न पुढे येतील...हे होणार नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार... ते देऊ शकत नाही...कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही...जी गोष्ट घडू शकत नाहीत... भेटू शकत नाहीत त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असं राज ठाकरेंनी सांगितले.


राज ठाकरेंचा शरद पवारांवरही हल्लाबोल-


1999 साली महान संत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म घेतला.  यानंतर जातीयवाड्याची पाळेमुळे खोलवर रुजली, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसेच मागील 40 वर्षांपासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले. मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही. मराठवाड्यात उद्योगधंदे  नाहीत, विदर्भात नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.