मंदिरांची नगरी कुंभनगरी ही नाशिकची खरी ओळख. ही ओळख ज्या परिसरामुळे जगभर झाली तो पंचवटी गोदावरी काठाचा परिसर ज्या भागात मोडतो तो हा नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ. पंचवटी, नाशिकरोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ. इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या केंद्रसरकारच्या महत्वाच्या आस्थापना याच मतदारसंघात असल्याने कामगार वस्तीलाही सामवून घेणारा मतदारसंघ आहे. धार्मिक, शेती आणि कामगार अशी या मतदार संघातील नागरिकांच्या अर्थकारणाची मुख्य चाकं आहेत. शहरातील तीन मतदारसंघापैकी विस्ताराने मोठा असणारा हा मतदारसंघ असून भाजपा शिवसेनेला मानंणारा मोठा वर्ग मतदार संघात आहे. मात्र २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला. बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे आणि सहकार क्षेत्राची जाणं असणारे कॉंग्रेस, शिवसेना या मार्गाने नगरसेवक, महापौर ते खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणरे स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवीत ४७ हजार ९२४ मते प्राप्त करून विजय संपादित केला होता.
२०१४ मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप तब्बल ७८ हजार ५५४ मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे चंद्रकांत लवटे दुसऱ्या तर कॉंग्रेसचे उद्धव निमसे तिसऱ्या स्थानावर फेकेले गेले. मनसेचे उमेदवार रमेश धोंगडे यांना अवघी १२ हजार ४३७ मत मिळाली. मोदी लाटेचा परीस स्पर्श झाला आणि नाशिकच्या महापौरपदाचा अनुभव असणारे बाळासाहेब विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीतच आमदार झाले. मात्र आता त्यांना तिकीट मिळविण्यासाठी झगडावं लागतंय. पालकमंत्री गिरीश महाजन यांची नाराजी त्यांना चांगलीच भोवली आहे.
आमदार झाल्या झाल्या नाशिकच्या शहराध्यक्षपदाची बक्षिसी त्यांना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची महापालिका निवडणूक सानप यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली. भाजपने कधी नव्हे ती ऐतिहासिक कामगिरी करत स्वबळावर तब्बल ६६ नगरसेवक जिकून आणले. पक्ष श्रेष्ठींचा सानप यांच्यावर विश्वास वाढला. सानपाकडे महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
नाशिकच्या भाजपात सबकुछ सानप अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात मनपा निवडणुकीत निष्टावंताना डावलणं, कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेणं, मनपाचा कारभार मनमानी पद्धतीनं करणं अशा तक्रारी वाढत गेल्या आणि सानप यांच्यावर पक्षश्रेष्ठींची खप्पामर्जी झाली. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा विजय पक्षाला चांगलाच जिव्हारी लागला आणि सानप यांच्या विरोधात उघड उघड नाराजी व्यक्त होऊ लागली. एवढेच नव्हे तर त्यांच्या आमदारकीला आव्हान देणारे उमेदवार तयार झाले.
कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि आता सध्या स्थायी समिती सभापतीपद भूषविणारे उद्धव निमसे, सुनील आडके, संभाजी मोरुस्कर, सुनील बागुल आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळीक साधल्याने आमदारकीची स्वप्न पडू लागलेले गणेश गीते अशी इच्छुकांची यादी बरीच मोठी आहे. तर शिवसेनेतून चंद्रकांत लवटे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, खासदार हेमंत गोडसे यांच्या गटातील जगदीश गोडसे अशी काही नावे चर्चेत आहेत. तर कॉंग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत.
मनसेचे राहुल ढिकले या सर्वामध्ये प्रबल दावेदार म्हणून ओळखले जात आहेत. गेल्या दीड दोन वर्षापासून राहुल ढिकले यांनी मतदारसंघ बांधायला सुरवात केलीय. माजी आमदार उत्तम ढिकले यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्या नावाचा फायदा राहुल यांना मिळत असून प्रतिस्पर्ध्यांना घाम फुटावा एवढी तयारी त्यांनी केलीय. मनसे आघाडीत सहभागी झाली तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या आघाडीचे ते उमेदवार असतील. मात्र गेल्या काही दिवसापासून राहुल भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही शहरात रंगू लागल्या आहेत. सध्या तरी राहुल यांच्याकडून या फक्त चर्चा असल्याचा निर्वाळा दिला जात आहे. एकूणच इच्छुकांची गर्दी खूप असली तरी चार पाच नावाभोवती मतदारसंघाचे राजकारण फिरताना बघायला मिळतंय. त्यात यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भर पडत असल्याने लोकसभा निवडणूक लढविणारे पवन पवार आमदारकीच्या निवडणुकीत नशीब आजमावतात का हे बघणं औत्सुक्याचं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातून २४ हजाराहून अधिक मते मिळाली होती.
निवडणूक तोंडावर आल्यानं उमेदवारांची धावपळ सुरु झालीय. त्यात सर्वाधिक प्राधान्य भाजपला दिल जातंय. युती होणार या आशेने शिवसेना फारशी तयारीत दिसत नाहीय. दुसरीकडे पुन्हा तिकट मिळविण्यासाठी बाळासाहेब सानप सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या सर्वामध्ये राहुल ढिकले उजवे ठरत असून प्रतिस्पर्ध्याला चांगली टक्कर देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. जातीय समीकरणाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. ढिकले मराठा असल्याने त्यांना पक्षात घेऊन मराठा कार्ड खेळावे असा एक मतप्रवाह भाजपात आहे. त्यातच ओबीसी गटातील बाळासाहेब सानप यांच्याकडील शहराध्यक्षपद काढून गिरीश पालवे यांना देण्यात आल्यानं ओबीसीचे वर्चस्व कायम ठेवण्याची नीती पक्षाने अवलंबली आहे. तिकीट वाटप जातीच्या आधारावर होतं का याकडे लक्ष लागलंय.
या मतदारसंघातील ग्रामीण भागात शेती परिसर असल्याने भाजीपाला, उस, द्राक्ष अशी विविध पिक घेतली जातात. शेतीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, बेरोजगारी, धर्मिक तीर्थक्षेत्राचा विकास, गोदावरीचे प्रदूषण, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंताना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणं असे अनेक प्रश्न या मतदारसंघात असून त्यावर मात करण्याचं आव्हान विजयी उमेदवार समोर असणार आहे.