जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणवतात, परंतु ते या देशाचे, इथल्या शेतकऱ्याचे चौकीदार नसून केवळ अनिल अंबानीचे चौकीदार आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आज राजस्थानमधल्या श्रीगंगानगर येथे काँग्रेसने सभेचे आयोजन केले होते. राहुल गांधी या सभेत बोलत होते.


राहुल गांधी म्हणाले की, "तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार पाहिला आहे का? देशातल्या बेरोजगार तरुणांच्या घराबाहेर कधी चौकीदार पाहिला आहे का? तुम्ही अनिल अंबानीच्या घराबाहेर चौकीदार पाहिला आहे का? नक्कीच पाहिला असेल. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानीच्या घराबाहेरचे चौकीदार आहेत." असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

राहुल म्हणाले की, "2014 च्या निवडणुकांपूर्वी देशवासियांनी भारतीय जनता पक्षाने खूप मोठी-मोठी आश्वासने दिली होती. भाजपने लोकांना 15 लाख रुपये देण्याचे, 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. साडेचार वर्ष होऊन गेली. तरी अद्याप लोकांना 15 लाख रुपये मिळालेले नाहीत. 2 कोटी रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. शेतकऱ्यांचे कर्जदेखील माफ झाले नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी काटकसर करुन घरात जे काही साठवले होते. नरेंद्र मोदींनी नोटबंदी करुन तेदेखील हिरावले आहे."