नवी दिल्ली : प्रख्यात अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आनंद जयाप्रदा यांनी व्यक्त केला. 'ज्या पक्षाचं नेतृत्व देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष घालतं, अशा राष्ट्रीय पक्षात मी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येणार आहे, याचा आनंद आहे' असं जयाप्रदा म्हणाल्या. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयाप्रदांनी भाजपप्रवेश केला.

1994 साली तेलुगू देसम पक्षातून जयाप्रदा यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र चंद्राबाबू नायडूंसोबतच्या मतभेदानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला. जयाप्रदा यांनी 2004 आणि 2009 मध्ये सपातर्फे खासदारपद भूषवलं आहे.

VIDEO | जयाप्रदा यांचा भाजप प्रवेश, आझम खान यांच्याविरोधात रिंगणात? | नवी दिल्ली | एबीपी माझा



मुलायमसिंह यांच्यासोबत झालेल्या वादानंतर जयाप्रदा आणि त्यांचे सहकारी अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दोघांनी राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला. 2014 मध्येही बिजनौरमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, मात्र भाजपकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. अखेर जयाप्रदा यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आझम खान यांनी त्रास दिल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी जयाप्रदांनी केला होता. आझम खान यांनी 2009 मध्ये आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अश्लील फोटोंचं वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला होता. जयाप्रदांनी आझम खान यांचा उद्धटपणा जिरवण्याची शपथ 2009 मध्ये घेतली होती. त्यानंतर दोघांमधील कटुता सर्वांसमोर आली.