नाशिक : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी मराठीत म्हण आहे. परंतु, या म्हणीचा प्रत्यय आला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत. नगरपंचायत निवडणुकीत दोन सख्ख्या जावांचा पराभव झाला तर तिसऱ्याच उमेदवाराचा विजय झाला. 


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजश्री सतीश देशमुख आणि संगीता प्रमोद देशमुख या सख्ख्या जावा आमने सामने होत्या. राजश्री यांनी शिवसेनेकडून तर संगीता यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. देशमुख घराण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मंगळवारी रात्री ही दोन्ही कुटुंबं झोपली नव्हती. कारण आजच्या निकालाकडे त्यांच्या नजरा होत्या. आज सकाळी दहा वाजता पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 7 च्या मतमोजणीला सुरुवात होताच गुलाल नक्की कोणती जाऊबाई उधळणार याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, भलतेच झाले.


राजश्री देशमुख आणि संगीता देशमुख या जावा बाजूलाच राहिल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लता रमेश बोरस्ते या निवडून आल्याची लाऊडस्पीकर वरून घोषणा झाली. लता बोरस्ते यांना सर्वाधिक 312 मतं मिळाली तर राजश्री देशमुख यांना 62 आणि संगीता देशमुख यांना 238 मते मिळाली. बोरस्ते यांच्या विजयाने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी चर्चा सुरू झाली. दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे.      


महत्वाच्या बातम्या