लखनौ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा फैसला केला आहे. भाजपच्या या दिग्गज नेत्याने आज कानपूर मधील मतदारांना एक हस्ताक्षर नसलेल्या पत्राद्वारे सांगितले की, पक्षानेच त्यांना निवडणूक न लढण्यास सांगितले आहे.


मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील मतदारांसाठी हे पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, "कानपूरमधील माझ्या प्रिय मतदारांनो, भारतीय जनता पक्षाचे संघटन महामंत्री रामलाल यांनी मला कानपूरसह कोणत्याही मतदार संघातून निवडणूक न लढण्यास सांगितले आहे." 2014 साली काँग्रेसच्या श्रीप्रकाश जायसवाल यांना हरवत जोशी खासदार झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींपाठोपाठ आता मुरली मनोहर जोशींचाही पत्ता कट झाला आहे. अडवाणी यांच्या गांधीनगर या मतदारसंघातून आता भाजपाध्यक्ष अमित शाहांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता मुरली मनोहर जोशी यांच्या कानपूर मतदार संघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्यात येतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान, आगामी निवडणुकीत मोदी-शाहांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा विसर पडत असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.