बीड : "पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा आहे, जो आता जनतेसमोर आला आहे," असं स्पष्टीकरण रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या आरोपांवर दिलं आहे. "तसंच नशेत बोलणाऱ्यांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत," असंही क्षीरसागर म्हणाले.


आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं, असा गंभीर आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील जाहीर सभेत केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना संदीप क्षीरसागर यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांनी सांगितलं.

'माझ्या आयुष्यात चरित्र आणि चारित्र्याला महत्त्व'
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, "मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मला पक्षप्रमुखांनी मंत्रिपदाची संधी दिली. मी माझ्या एकूण राजकीय आयुष्यात चरित्र आणि चारित्र्य याला खूप महत्त्व देतो. त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांवर जास्त स्पष्टीकरण देणार नाही. तसंच पैसे देणे आणि घेणे हे माझ्या कुठल्याच निकषात बसत नाही. पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा आहे जो आता जनतेसमोर आला आहे."

राजकारणाचा पोरखेळ सुरु आहे : जयदत्त क्षीरसागर
"माझे कपडे फाडू म्हणणाऱ्यांवर स्वतः कपडे काढून फिरण्याची वेळ आली आहे. अहंकाराची धुंदी फार काळ टिकत नसते. त्यामुळे  राजकारणाचा पोरखेळ सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करताना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही खालची पातळी गाठली नाही. तुम्ही असे खालच्या पातळीवरचे राजकीय आरोप करत आहात म्हणजे आता तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास गमावला आहे," असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.