मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ सभा घेतली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी या संदीप देशपांडे यांच्यासाठी दुसऱ्यांदा सभा घेत असल्याचा उल्लेख केला. मतदारसंघांमध्ये दोन-दोन सभा मी खूप कमी घेतल्या आहेत, त्यामध्ये ही वरळी एक आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाषणाची सुरुवात केली. आपल्या भाषणातून राज्य सरकार व आत्तापर्यंतच्या राजकीय नेत्यांवर त्यांनी जोरदार प्रहार केला. तर, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बॅग तपासणीबाबत सुरू असलेल्या भाषणावरूनही टीका केली. तसेच, भूमिका बदलावरुन सध्या राज ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे, त्यावर त्यांनी शरद पवारांचे (Sharad pawar) उदाहरण देत, शरद पवारांबद्दल बोलायलाच नको, भूमिका पण लाजते, असे राज यांनी म्हटले.  


उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणीचा व्हिडिओ काढल्यानंतर आता सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यावरुन, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. बॅग तपासली म्हणून काही जणांचं रडूबाई रडू सुरू आहे. पण, निवडणूक आयोगाला समजायला हवं, त्यांच्या हातामधून पैसे सुटत नाही, त्यांच्या बॅगेतून कसे पैसे निघणार, असा टोला राज यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनुशक्ती प्रकल्पाला कोकणामध्ये विरोध केला आहे. आता ऑइल रिफायनरीला विरोध करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या उद्योगपतीला मदत करत आहेत, हे कोणाचे लग्नाला जातात, असा सवालही राज यांनी केला. 


भूमिकेवरुन शरद पवारांवर टीका


राज ठाकरेंनी भूमिका बदलावरून शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार हे आयुष्यभर भूमिका बदलत गेले, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको भूमिका पण लाजते, अशा शब्दात टीका करत राज यांनी शरद पवारांच्या राजकीय इतिहासाची उजळणी केली. त्यांनी शरद पवारांचा राजकीय इतिहास वाचून दाखवला, त्यामध्ये त्यांनी कशा भूमिका बदलल्या ते सांगितलं. तर, मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या नाहीत. या देशामधला पहिला माणूस मी होतो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे अशी भूमिका घेतली. मला ज्या गोष्टी हव्या होत्या, त्याच्याविरुद्ध गोष्टी चालू केल्या. नोटा काय बंद झाल्या, पुतळे काय उभे राहिले, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधातील भूमिकेवर भाष्य केलं. तर, 2019 मध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या, त्यामध्ये कलम 370 हटविणे असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 


संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरे व मुरली देवरांवर टीका


महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत मनसे आहे, असं काल उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले होते. मग गेली 25 वर्षे तुम्ही मुंबई लुटली, या लुटीतूनच मातोश्री 2 उभी राहिली. कोरोना काळात तुम्ही बॉडी बॅग, खिचडी घोटाळा केला, याचं काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला. तसेच, वरळीत मिलिंद देवरांना कधीही लीड मिळाली नाही, देवरा आता भांडी वाटत आहेत. मात्र, यांनाच वरळीकर भांडी घासायला लावतील, अशी टीका मिलिंद देवरा यांच्यावर केली. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा म्हणाले होते, मुंबई तुमची भांडी-घासा आमची, आता यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवालही देशपांड यांनी विचारला. 


हेही वाचा


अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले