बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. या सबबेनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील, मराठा आरक्षण आणि गौतमी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली. गौतम अदानी यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा ध चा मा केला जात आहे. त्यांचा राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इथे निजामशाही होती, अनेक वर्ष निजामशाही असल्यामुळे इथे कुंणबी प्रमाणपत्र दिले गेले नव्हते, असे अजित पवार यांनी म्हटले. राज्यातील विधानसभा निडणुकांमध्ये काही राजकीय पक्ष जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करत असल्याचा प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहेत, असे ते म्हणाले. 


राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत होत आहे. मराठा आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करत महायुती व भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला जात आहे. त्याअनुषंगाने अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार स्टेजवरुन जरांगे पाटील यांचा सातत्याने उल्लेख करतात, त्यासंदर्भाने बोलताना अजित पवार म्हणाले की, जरांगे पाटील गेले अनेक वर्ष समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे. सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं. आपल्या इथे तो मुद्दा जास्त प्रकर्षाने समोर आला, हे इथे निजामशाही होती अनेक वर्ष निजामशाही असल्यामुळे इथे कुंणबी प्रमाणपत्र दिले गेले नव्हते. जे विदर्भातल्या अनेकांना मिळालं, जे कोकणातल्या अनेकांना मिळालं, जे उत्तर महाराष्ट्रातल्या अनेकांना मिळालं. प्रश्न फक्त मराठवाड्याचा राहिला आहे, त्यांनी आंदोलन केल्यानंतर आम्ही कागदपत्रं तपासून त्या ठिकाणी काहींना कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामध्ये आपण जवळपास काही लाख लोकांना तशाप्रकारचे प्रमाणपत्र दिले आहेत. त्या लोकांना फायदा झाला असून ते ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना लाभ मिळत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. 


जरांगे पाटील भूमिका मांडण्यासाठी सक्षम


कुणी नाव घेतलं तरी शेवटी जरांगे पाटील हे त्यांची भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहेत, त्यांनी पहिल्यांदा काही गोष्टी सांगितल्या, त्यांनी मुलाखती घेतल्या, उमेदवार जाहीर करू असे म्हटले. मात्र, पुन्हा त्यांनी यातून माघार घेतली आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, आरक्षण हे समाजाला मिळालं पाहिजे त्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं कारण नाही, असेही अजित पवारांनी म्हटलं. 


हेही वाचा


विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान