पुणे (आंबेगाव) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केलीय, जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, या निवडणुकीत वळसे पाटलांना 100 टक्के पराभूत करा, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी देवदत्त निकम यांना विजयी करण्याचं आवाहन करत हल्लाबोल केला.
दिलीप वळसे पाटलांना जे शक्य असेल ते दिलं...
आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं, असं शरद पवार म्हणाले.
दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केलीय, गद्दारांना सुट्टी नाही : शरद पवार
शरद पवार यांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नसल्याचं शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून म्हटलं.
शरद पवार पुढे म्हणाले, माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आता अलीकडे ही ती भीमाशंकरला जाऊन आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.
ते म्हणतात साहेब माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत, आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :