Karnataka Assembly Elections 2023: देशातील आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने दक्षिण भारतामध्ये प्रवेशद्वार आणखी प्रबळ करण्यासाठी भाजपकडून कर्नाटकमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक हाती घेत राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक पूर्णतः स्थानिक मुद्यांवरून आणि गेल्या पाच वर्षात 40 टक्के कमिशनविरोधात कर्नाटकात रान उठवत ही निवडणूक जिंकली.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक यश मिळवताना तब्बल 130 हून अधिक जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जनता दल सेक्युलरची मदत काँग्रेसला घ्यावी लागेल असं बोललं जात होतं. मात्र, या सर्व चर्चांना काँग्रेसने पूर्णविराम देत सत्ता मिळवलेली आहे. कर्नाटकी जनतेने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे तो पाहता भाजप नेतृत्वाला एक प्रकारे 2024 साठी सूचक इशारा तर दिला ना? असा सवाल उपस्थित झाला आहे. कर्नाटक राज्यासह महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा भागामध्ये काँग्रेसला मिळालेले यश हे निश्चितच आत्मविश्वास देणारे आहे.
बेळगावमध्ये काँग्रेसची मुसंडी
बेळगावला कर्नाटकच्या उपराजधानीचा दर्जा आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये तब्बल 11 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर सात जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तब्बल अकरा जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातील नेत्यांची मांदियाळी उतरली होती.
महाराष्ट्रात सूचक इशारा
सीमावर्ती भागात काँग्रेसला मिळालेलं यश हे नक्कीच महाराष्ट्रातील राजकीय चिंता वाढवणारे आहे यात काही शंका नाही. सीमावर्ती भागाला कोल्हापूर, सांगली, सोलापूर ते तीन जिल्हे जोडले गेले आहेत. त्यामुळे या निकालाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणारच नाही असं म्हणणं निश्चितच हे राजकीय धाडसाचे ठरेल.
बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, चिकोडी, कागवाड कुडची, कारवार या सहा विधानसभा सीमावर्ती मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये नक्की उमटणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी मंडळी सीमावर्ती भागामध्ये प्रचार करण्यात आघाडीवर होती.
महाराष्ट्र एकीकरण समितीने या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने सीमाभागात प्रचारासाठी येऊ नये, असं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र, शिवसेना ठाकरे गट वगळता सर्वांकडून प्रचार करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये जरी भाजपचा विजय झाला असला, तरी तर त्या ठिकाणी विरोधकांना पडलेली मते ही सुद्धा निश्चित महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थां निवडणुका, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत या निकालाचा नक्की राहील असे बोलले जात आहे.