पुणे : पतंप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज दुसरा दौरा होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूरातील सभेतूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यानंतर, पुण्य नगरी असलेल्या पुणे शहरातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम 370 वरुन काँग्रेसवर निशाणा साधला. पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा होत असताना एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असताना व्हीव्हीआयपी रांगेतच काहीप्रमाणत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा (Maratha) कार्यकर्ता उठला आणि एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. 


जालन्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिंमतीने लढली आहे. त्यामुळे, राज्यभरातील मराठा एकटवला असून मराठा आरक्षणासाठी आपलं योगदान देत आहे. त्यातूनच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मराठा बांधवाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लक्ष वेधले. मराठा आरक्षण भेटलच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जॅकीट घातलेला हा कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती. विशेष म्हणजे पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी होती, आणि हा कार्यकर्ता व्हीव्हीआयपी रांगेत बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अखेर पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत करुन सभास्थळावरुन दूर नेले. मात्र, या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाच वातावरण निर्माण झाल होतं. 


अमित शाह यांची मुंबईत सभा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील उमेदवारांसाठी पुण्यात सभा घेतली तर, गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत सभा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शाह यांची आज मुंबईतील दुसरी सभा बोरीवलीत पार पडली. सप्ताह मैदानातून गृहमंत्री अमित शाहांनी जाहीर सभेला संबोधित केले. उत्तर मुंबईतील सहा उमेदवारांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदिवलीचे उमेदवार अतुल भातखळकर, मालाड पश्चिमचे उमेदवार विनोद शेलार, चारकोपचे उमेदवार योगेश सागर, बोरीवलीचे उमेदवार संजय उपाध्याय, मागाठाण्याचे उमेदवार प्रकाश सुर्वे, दहिसरच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्यासाठी अमित शाह यांची सभा पार पडला. 


हेही वाचा


स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली