जालना : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी पंतप्रधानांना वरती टीका केली नाही. त्यांचेच काही नेते मराठा समाजाचा द्वेष करतात. तिसऱ्यांदा सत्ता येऊ लागली म्हणून भीती दाखवत आहेत का? परिसरात मोदी साहेबांना इथेच राहण्याची वेळ आली होती. भाजपच्या चार दोन लोकांमुळे ही वेळ आली, जे सत्य ते मी सांगितलं. राज्यात सर्वच जातींचे हाल झाले आहेत. इथून पुढे त्या जातीचा स्वाभिमान जागा होणार आहे. यांनी काही जातीचे नेते संपवले आहेत.  काही जात संपवल्या आहेत. त्यांचे काही नेते आपला द्वेष करणे सोडत नाही, काड्या करणे, आंदोलन फोडणे, खोट्या केसेस करणे, हल्ले करणे सत्तेचा पदाचा दुरुपयोग करणे हे त्यांचे सुरूच असते, असा निशाणा त्यांनी यावेळी सरकारवर साधला आहे. 


राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं


एक्झिट पोलवर मी कसा बोलणार मी राजकारणातच नाही. मी ज्या दिवशी नाव घेतलं त्या दिवशी माझ्या समाजाची प्रतिष्ठा पणाला लागेल. मी नाव घेऊन कोणाला पाडा म्हटले नाही.  मी मराठ्यांना तुमच्या मताची किंमत केली पाहिजे, भीती वाटली पाहिजे, असे मी म्हटले होते. राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार म्हणजे कर्माची फळ, नियतीला सहन होत नाही, हा निसर्गाचाच नियम आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 


आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू


ते पुढे म्हणाले की, सर्व जातींना यांनी फसवलं आहे. धनगर, बंजारा, लिंगायत सर्वांची परिस्थितीच आहे. शेवटी नेते हरवायला लावते.  अन्यायाला वाचा फोडायला जनतेला लोकशाही रूपी हत्यार हातात घ्यावे लागले. सत्ता गोड बोलून घ्यायची आणि त्या जनतेवर पुन्हा अन्याय करायचा. चार-पाच दिवसापासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू आहेत. आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय? आम्हाला फक्त आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे. 


मी आंदोलनावर ठाम 


कोणी निवडून आला आणि पडला तरी आनंद आहे. राग व्यक्त करू नका आणि कोणी सोशल मीडियावर पोस्टही करू नका. गाव पातळीवर एकही ओबीसी बांधव मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलन मोडण्यासाठी खोड्या करूच नये. गोडी गोलाव्याने आंदोलन हाताळा. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, आम्हाला राजकारणात यायचं नाही. नाहीतर 288 विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करणार मग मात्र खूप फजिती होईल. 4 तारखेला मोठ्या संख्येने आंदोलक येणार आहेत. मी आंदोलनावर ठाम आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा


जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा, बीडची निवडणूक वनसाईड, मी 100 टक्के जिंकणार : बजरंग सोनवणे