Bajrang Sonwane : बीड लोकसभा मतदारसंघात (beed Lok Sabha Constituency) काटे की टक्कर पाहायला मिळाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) काल समोर आले. यात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाचा मला फायदा होणार आहे. बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय होणार, असा दावा त्यांनी केला आहे.
बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावरच झाली. जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तोच मूड बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. हे सर्वे कसे करतात काय करतात याबाबत मला माहीत नाही. पण, मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे, असे त्यांनी म्हटले.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा
ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा फायदा जरी मला झाला असला तरी मला सगळ्या समाजाने मतदान केले. मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. मी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले त्याला मला उत्तर द्यावं लागेल. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप ऐकायला बरे वाटतात. त्यामुळे कुणालाही मते पडतात, असे अजिबात नाही. मी या निवडणुकीत उमेदवारी घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही. यापूर्वी सुद्धा माझ्यावर काय परिणाम झाला हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त हे परिणाम अगदी घराच्या चुलीपर्यंत येऊ नयेत, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.
बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील बड्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. आता या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याचे चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
'मोदींसारख्या तपस्वी, ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे', संजय राऊतांचा टीकेचा बाण