नाशिक : मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नाशिकच्या येवला मतदारसंघात सांत्वनपर भेट दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, इथं दोघांना पाडा म्हणत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना लक्ष्य केलं. विशेष म्हणजे येथील मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतालाही मोठी गर्दी झाली होती, यावेळी भाषण करतानाही जरांगे पाटील यांनी भुजबळांना लक्ष्य केलं. त्यानंतर, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन जरागेंच्या वक्तव्यावर व त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे बोलले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, ते म्हणणे पण बरोबर आहे. त्याला कारण असे आहे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे, अजित पवार आम्ही कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.
राज्यात यंदाच्या निवडणुकीनंतरही सरकार महायुतीचे स्थापन होणार त्यात शंका नाही. लोकशाहीने जे अधिकार दिले आहेत ते कोणीही गाजवू शकतो, त्यात विशेष काय आहे. शांततेने आणि लोकशाही मार्गाने कोणीही आपापले म्हणणे मांडू शकतो. मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात बोलताना येवला पवित्र करा, असे म्हटलं होतं. त्यावरही, भुजबळांनी भूमिका मांडली. तुम्हाला कोणी सांगितलं आमचा येवला अपवित्र आहे, येवला पहिल्यापासून पवित्रच आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसेनानी लढ्यात सहभागी सेनापती तात्या टोपे हे येवल्यात जन्मलेले होते. जगदंबा माता मंदिर शनी मंदिर मारुती मंदिर आदीसह अनेक मंदिरे या येवल्यात आहेत. येवल्यातील लोक कीर्तन, भजन देखील करतात, अतिशय पवित्र असे आमचे शहर आहे, असे प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिले.
येवला मतदारसंघातील प्रत्येक गटात मला उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळत आहे, मोठी गर्दी प्रत्येक प्रचारसभेला होत आहे. ज्याला जे बोलायचे ते तो बोलत राहील, आपण आपले काम सुरू ठेवायचे. मला ते माहित नाही ते नक्की काय बोलले. पम, ठीक आहे, कधी कधी जुने ते सोने असेही म्हणतात लोक, असा टोलाही भुजबळ यांनी जरांगेंना लगावला. कार्यक्रम करा, या जरांगेंनी केलेल्या टीकेवर, मराठा समाज बांधव माझे कार्यक्रम करतातच ना, अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम घेतले जातात, असा खोचक टोला भाजपने मनोज जरांगे यांना लगावला. अंदरसुल येथे मोठा कार्यक्रम झाला, मतदार संघातील पाटोदा, नगरसूल, लासलगाव येथे मोठ मोठाले कार्यक्रम झालेच ना. कार्यकर्ते सोबत आहेच ना, त्यांना वेगळे काही सांगायचे आहे, पण तुम्ही मन कवडे आहेत का, त्यांच्या मनात काय हे तुम्हाला काय माहिती, असेही भुजबळ यांनी म्हटले.
हेही वाचा
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार