मुंबई : काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची नाराजी दूर व्हावी म्हणून त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित संतापले. आपण आदिवासी असल्यानं अशी वागणूक देता का असा सवालही त्यांनी यावेळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची समजूत काढली.


VIDEO | मल्लिकार्जुन खर्गेंची भेट न झाल्याने माणिकराव गावित संतापले | मुंबई | एबीपी माझा


आज काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल,  मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा झाली.

यावेळी नाराज माणिकराव गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलावलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित यांचा संताप अनावर झाला. मी आदिवासी आहे म्हणून मला अशी वागणूक देता का?  असा सवालही त्यांनी यावेळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची समजूत काढून समाधान करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत

मुलाला लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे गावितांनी आपली नाराजी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली होती.  माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं होतं. पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव नाराज आहेत. भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे तरुणांनाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र इतकी वर्ष काम करुन आपल्या मुलाला तिकीट न दिल्याने नाराज झाल्याचं गावित म्हणाले होते.

नंदुरबारमध्ये भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा संधी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना रिंगणात उतरवलं आहे. मुलाला तिकीट देण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे माणिकराव बंडाच्या तयारीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बडं प्रस्थ असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडाळीचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.

यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे,  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.