कल्याण : कल्याणमध्ये शिवसैनिकांच्या नाराजीमुळे भाजपचे खासदार कपिल पाटील यांची वाट बिकट बनल्याचं चित्र आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला मिळणार असेल, तरच कपिल पाटील यांना मदत करु, अशी जाहीर भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळं आता यावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.


भिवंडी लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदार यंदाचे उमेदवार कपिल पाटील यांची वाट यंदा बिकट असल्याची चिन्हं आहेत. कारण संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पाटील हे ठिकठिकाणी शिवसैनिकांसोबत मेळावे घेत आहेत, मात्र या प्रत्येक ठिकाणी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे.

या सगळ्यावर वादावर पडदा टाकण्यासाठी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर माफीही मागितली होती, मात्र शिवसैनिकांची नाराजी काही कमी होताना दिसत नाही. याच मतदारसंघाचा मोठा भाग असलेल्या कल्याण पश्चिम भागातही शिवसैनिकांनी कपिल पाटील यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 38 नगरसेवक आहेत. ज्यापैकी भाजपचे अवघे 7, तर शिवसेनेचे तब्बल 26 नगरसेवक आहेत. 2099 साली युतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आला होता. मात्र मागील निवडणुकीत स्वतंत्र लढताना इथून शिवसेनेचा अगदी थोड्या मतांनी निसटता पराभव झाला होता.