कोलकाता : ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत एकसारखीच आहे. केंद्रातले सरकार आणि पश्चिम बंगालमधील सरकार लोकांना गृहीत धरुन काम करतात, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला विक्रमी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल यांच्या सभेला झालेली गर्दी पाहून ही घटना म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. राहुल यांनी काल (शनिवारी)तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनादेखील लक्ष्य केले. राहुल म्हणाले की, "केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार कोणाच्याही सल्ल्याशिवाय जनतेकडे दुर्लक्ष करुन काम करत आहेत. दोघांची कार्यशैली एकसारखीच आहे. मोदी आणि ममता दोघेही त्यांच्या भाषणांमध्ये खोटी आश्वासने देण्याचे काम करतात. नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. ते जिथे कुठेही जातात तिथे केवळ खोटं बोलत असतात."

राहुल म्हणाले की, "डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे ममता बॅनर्जी काम करत आहेत. बंगालचा आवाज ममतांपर्यंत पोहचत नाही. बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. परंतु आता घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही आता केंद्रात सरकार बनवत आहोत. आम्ही हे बंद करु."