काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर, नांदेड लोकसभेसाठी अखेर अशोक चव्हाणांनाच उमेदवारी
एबीपी माझा वेब टीम | 24 Mar 2019 07:39 AM (IST)
राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागल्यानेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते, पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून अशोक चव्हाणांनाच लोकसभा लढण्यास सांगितले आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मध्यरात्री काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली गेली. यात अशोक चव्हाणांना नांदेडमधून लढण्याचे आदेश पक्षाध्यक्षांनी दिले आहेत. याच बरोबर या यादीत मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यातून तर दिग्विजय सिंह भोपाळमधून लढत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान लोकसभेतील संख्याबळ वाढीसाठी कोणतीही रिस्क न घेण्याचा काँग्रेस पक्षाने एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांनांच लोकसभा निवडणूक लढवण्याची सक्ती केली आहे. याआधी अशोक चव्हाणांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच लोकसभेसाठी पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागल्यानेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते, पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून अशोक चव्हाणांनाच लोकसभा लढण्यास सांगितले आहे. पक्षाचे दुसरे खासदार राजीव सातव हे गुजरातमधील जबाबदारीमुळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडले आहेत. रत्नागिरीचा उमेदवार बदलला जाणार नसला तरी चंद्रपूरवरून झालेल्या वादामुळे पक्षात फेरविचार सुरू झाला आहे. काँग्रेसची उमेदवार यादी