नाशिक : दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. (भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशीदेखील त्याची ओळख आहे)स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. पुष्पाताई नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवले.


2004 साली दाभाडी मतदार संघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला. येथूनच हिरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाला उतरती कळा लागली. वर्षानुवर्षे एकाच घराण्याला पाढिंबा देणाऱ्या दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत प्रथमच हिरे घरण्याला बाजूला सारले आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला.

2009 च्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मतदार संघात केलेली विकासकामे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. त्याचा फायदा त्यांना 2004 आणि 2009च्या निवडणुकीत झाला. सलग दोन वेळा निवडून आल्यावर भुसे यांनी विकासावर अधिक भर दिला. शिवाय युवाशक्ती त्यांच्या मागे उभी ठाकली, गावा गावात त्यांनी सेनेचा प्रभाव वाढविला.

स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मागे उभे ठाकत ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधक कमी करत गेले. याचाच फायदा त्यांना 2014 च्या निवडणूकीत झाला आणि सलग तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. युतीच्या सत्तेत शिवसेनेने त्यांची ग्रामविकास राज्यमंत्री पदावर वर्णी लावली. केवळ ग्रामीणच नाही तर मालेगाव शहरातही त्यांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले असल्याने महापालिका निवडणुकीत सेनेचे नगरसेवक निवडून आणले. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय खेळी करत कॉंग्रेसच्या मदतीने त्यांनी महापालिकेत सेनेचा उपमहापौर बसवला, जो मालेगाव महापालिकेत ऐतिहासिक ठरला.

ग्रामविकास राज्यमंत्री झाल्यानंतर औद्योगिक वसाहत, मोसमनदी स्वच्छता याचबरोबर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठा निधी मिळविण्याबरोबरच अनेक विकासकामे सुरु केली. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामुहिक विवाह सोहळे साजरे करुन मतदारसंघातील जनतेवर सामाजिक कार्याची छाप पाडली.

2019 च्या निवडणुकीत दादा भुसे समोर सक्षम पर्याय देण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी बैठक घेत निवडणुकीची रणनिती आखण्यात आली. सेना-भाजपची युती न झाल्यास भाजपकडून नगरसेवक सुनिल गायकवाड हे उमेदवार राहू शकतात, तर कॉंग्रेसकडून प्रसाद हिरे आणि कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुपार शेवाळे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रशांत हिरे किंवा त्यांचे पूत्र अद्वय हिरे हे दावेदार मानले जात आहेत. तर भुसे यांचे सुरुवातीपासून जवळचे असणारे पण त्यांच्यापासून दुरावलेले बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव यांनी बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यामातून स्वतःचा सवतासुभा उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे शक्ती प्रर्दशन केले या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
दादा भुसे - शिवसेना - 82,093 मतं
पवन ठाकरे - भाजपा - 44,672 मतं
सुनिल गायकवाड - राष्ट्रवादी - 34,117 मतं
संदीप पाटील - मनसे - 8,561 मतं
डॉ.राजेंद्र ठाकरे - कॉंग्रेस - 4,551 मतं

दरम्यान मालेगावला स्वतंत्र जिल्हा करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. प्रत्येक निवडणुकीत मालेगावला जिल्हा करण्याचे आश्वासन देण्यात येऊनही तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. मालेगाव शहराची लोकसंख्या आणि विस्तार पाहता मालेगावमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी जोर धरु लागली.

सध्य परिस्थितीला दादा भुसे यांचे संपूर्ण मतदार संघावर एकहाती वर्चस्व असून पंचायत समिती, बाजार समिती यावर सेना-भाजपाच वर्चस्व सध्य परिस्थितीला आहे.

एकूणच मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी सर्वच विरोधक एकवटून त्यांच्यासमोर प्रबळ उमेदवार देणार का? हे पाहणे मोठ औत्सुकतेचे ठरणार आहे. तर विरोधकांवर मात करण्यासाठी भुसेंनी कंबर कसली असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर देत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज केले जात आहे.

एकंदरीतच येत्या निवडणुकीत दादा भुसे विरोधात त्यांचे विरोधक प्रबळ उमेदवार देणार की भुसे एकर्तफी निवडणूक जिंकून पुन्हा चौथ्यांदा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.