मुंबई: राज्यात सध्या एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे निवडून आलेल्या आमदारांचे डोळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारने मंत्रिमंडळासाठी (Maharashtra Cabinet) 21-12-10 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


भाजपने मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला असतानाच दुसरीकडे प्रशासनातील तीन महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपकडून अर्थ, गृह आणि सामान्य प्रशासन या तीन महत्त्वाच्या खात्यांवर दावा सांगितला आहे. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये अजित पवार हे अर्थमंत्री होते. या खात्याच्या माध्यमातून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मोठे आर्थिक पाठबळ पुरवले होते. त्यामुळे शिंदे आणि भाजपचे आमदार अजितदादांवर नाराजही होते. मात्र, आता भाजपने हे अर्थ खाते स्वत:कडे घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपकडे अर्थ खाते आल्यास ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. अर्थ खात्याच्या मोबदल्यात अजितदादा गटाला महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खाते  दिले जाईल, अशी चर्चा आहे. तर गृह खाते भाजपकडेच राहिल्यास ते कोण सांभाळणार, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली होती. ही योजना राबवण्यात अर्थखात्याचा सहभाग महत्त्वाचा होता. मात्र, आता जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार महायुती सरकारला लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येणार, हे अपेक्षित आहे. त्यामुळे आर्थिक आव्हाने प्रभावीपणे हाताळण्याच्यादृष्टीने देवेंद्र फडणवीस अर्थखाते स्वत:कडेच ठेवतील, असा कयास आहे. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. मात्र, राज्यातील गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृहमंत्री म्हणून फडणवीसांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. परंतु, हे खाते विरोधकांवर वचक राखण्याच्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आता फडणवीस मुख्यमंत्रीपद आणि अर्थ खात्याबरोबर गृहमंत्रालयासारख्या तापदायक खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवणार का, हे बघावे लागेल. 


दिल्लीत आज महत्त्वाची बैठक


दिल्लीत आज महायुतीचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा


अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...