मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीतला तिढा सुटला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मनोज जामसुतकर यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून (Byculla Assembly Seat) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळं या मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमने सामने येणार आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेककडून मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) रिंगणात आहे.
भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. मनोज जामसुतकर यांना शिवसेना ठाकरे गटातून भायखळा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. ठाकरेंकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील दोन जागा संदर्भात अजूनही तिढा कायम असताना त्यातील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा चित्र आहे
शिवसेना ठाकरे गटाकडून भायखळा विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक उपनेते मनोज जामसुतकर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मनोज जामसुतकर सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने सुद्धा दावा सांगितलेला असताना अखेर हा तिढा सुटल्याचं सांगण्यात आलंय.
मनोज जामसुतकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. आशिष चेंबुरकर यांनी साथ दिली. उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवत भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि मविआनं जो विश्वास दाखवला आहे त्याला न्याय देत आमदार म्हणून निवडून येणार असल्याचं जामसुतकर म्हणाले.
मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव असा सामना भायखळा विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात ही लढत होणार आहे.
आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा असा सामना
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आदित्य ठाकरे उमेदवार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे देखील रिंगणात आहेत. त्यामुळं या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
संजय राऊत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात भेटी गाठी सुरु आहेत. संजय राऊत सध्या शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मविआत काही जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळतेय.
इतर बातम्या:
हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, भाजप आमदाराला दिल्लीतून फोन; नाशिक पोलिसांनी घेतला शोध